नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून पुकारण्यात आलेल्या चलो संसद आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून झाल्याने आंदोलक सैरभैर झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीनंतर आंदोलनकर्ते सैरभैर झाले असून संसदेच्या १५० मीटर अंतरावर मोर्चा रोखण्यात आला आहे. संसदेचे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून अनेक तरुण तरुणींची डोकी फोडण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांनी सकाळीच मोर्चाला सुरू होण्यापूर्वी बळाचा वापर करताना अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर आंदोलकांना करंट सुद्धा दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
अनेक आंदोलकांनी बॅरिकेड्सना हात लावल्यानंतर करंट बसल्याचा गंभीर आरोप केला. या संदर्भात काही पत्रकारांनी पोलिसांना विचारला असता पोलिसांनी त्यावरती कोणतही उत्तर न देता बाजूला व्हा, बाजूला व्हा अशा पद्धतीने उत्तर दिली. त्यामुळे दिल्लीमध्ये दिल्ली पोलिसांची दमनशाही सुरू आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आज सकाळपासूनच दिल्लीच्या जंतरमंतरवर हजारांची गर्दी देशभरातून जमा झाली आहे. या गर्दीला आवरण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून अत्यंत अमानुष पद्धतीने बळाचा वापर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एकंदरीतच काही आंदोलकांनी आम्हाला मारा, आम्हाला मारा अशा पद्धतीने पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर अनेकांची डोकी सुद्धा फोडण्यात आली आहेत. दरम्यान, आंदोलनाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न होताच आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत संसदेच्या दिशेने कूच केली. त्यामुळे संसद परिसराला आता अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर हजारो विद्यार्थी रस्त्यावरती उतरल्याने आता संसदेचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा सोडण्यात आल्या. त्यानंतर आंदोलकांना सैरावैरा पळण्याची वेळ आली. दरम्यान, संसदेत कामकाज सुरू असतानाच काही संसद खासदार सुद्धा आत होते. दरम्यान, तत्पूर्वी आंदोलकांनी राजीव चौक आणि मंडी हाऊस येथील मेट्रो स्टेशनमध्ये सुद्धा घेराव घालत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी १० वाजेपासूनच लोकांनी संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी अत्यंत बळाचा वापर करत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सकाळपासूनच केल्यामुळे आंदोलक सैरभैर झाल्याचे दिसून आले.